मानवी नातेसंबंधांचा अनेक कोनातून विचार करून त्यातील गुंतागुंतीचे पदर उलगडून दाखविणारे लेखक, नाट्यसंहितेत विषयाच्या अनुषंगाने प्रयोगशीलता आणणारे समर्थ चिंतक आणि हिंसा, क्रौर्य, लैंगिकता, शोषण, व्यसनाधीनता असा कोणताही वर्ज्य नसणारे बंडखोर साहित्यिक म्हणून विजय तेंडुलकर यांचा लौकिक होता. विजय धोंडोपंत तेंडुलकर यांचा जन्म मुंबईत एका मध्यमवर्गीय कुटुंबात 1928 मध्ये झाला. गिरगावातील एका चाळीत वाढलेल्या तेंडुलकरांचे मन मात्र पारंपारिक धर्तीच्या शिक्षणात कधीच रमले नाही. वयाच्या 15 व्या वर्षीच त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकला आणि एका ग्रंथविक्रेत्याकडे नोकरी धरली. त्यानंतर मुद्रित तपासनीस, छापखान्याचे व्यवस्थापक, पत्रकार अशा विविध प्रकारच्या नोकऱ्या त्यांनी केल्या. या धावपळीतून त्यांना जे जीवनानुभव मिळाले त्यातूनच त्यांच्यातील लेखक घडत गेला.
तेंडुलकर साहित्य प्रांतात अवतरले तेव्हा नवकाव्य आणि नवकथेचा जोर चालू झाला होता. जुन्या पद्धतीचे आणि इंग्रजी साहित्यावरून रुपांतरीत असणाऱ्या साहित्याच्या पार्श्वभूमीवर मात्र तेंडुलकर यांची नवी शैली अचानक चमकू लागली. 1955 मध्ये त्यांनी ‘गृहस्थ’ हे पहिले नाटक लिहिले व त्यानंतर ‘श्रीकांत’ आणि ‘माणूस नावाचं बेट’ ही त्यांची नाटके आली. सत्य आणि आभासाचे नाते त्यात त्यांनी उलगडून दाखविले. 1963 मध्ये त्यांचे ‘शांतता! कोर्ट चालू आहे’ हे नाटक रंगभूमीवर अवतरले आणि त्यातील अभिरूप न्यायालयाचा खेळ सर्वांनाच भावला. या नाटकामुळे केवळ महाराष्ट्रातच नव्हे; तर राष्ट्रीय स्तरावर तेंडुलकर यांचे नाव झाले. त्यानंतर मात्र त्यांची ‘गिधाडे’, ‘सखाराम बाईंडर’, ‘घाशीराम कोतवाल’, ‘पाहिजे जातीचे’, ‘मित्राची गोष्ट’, ‘कमला’ आणि ‘कन्यादान’ ही नाटके जणू मैलाचे दगड ठरत गेली.
प्रत्येक संहितेत त्यांनी समाजाला विचार करायला लागेल असा स्फोटक विषय हाताळला. कालानुरूप त्यांची नाट्यप्रतिभा पटकथा लेखनाच्या रुपात व्यक्त झाली. ‘मंथन’, ‘निशांत’, ‘आक्रोश’, ‘अर्धसत्य’, हे हिंदी चित्रपट; तसेच ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘उंबरठा’ आणि ‘आक्रित’ या मराठी चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या. ‘स्वयंसिद्धा’ ही त्यांची टीव्ही मालिकाही गाजली. 1984 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. तेंडुलकरांच्या काही नाटकांमुळे मोठे वाद झाले. पण त्यातील विषयांचे महत्व व मांडणीची गरज कोणीच नाकारू शकत नाही.
“संकलित बातम्यांमधून“