फील्डमार्शल सॅम माणेकशा यांचा जन्म अमृतसरमध्ये स्थायिक झालेल्या एका सुखवस्तू पारशी कुटुंबात 3 एप्रिल 1914 रोजी झाला. चार मुले आणि दोन कन्या असलेल्या या कुटुंबात माणेकशा यांचा नंबर पाचवा. नैनितालच्या शेरवूड विद्यालयात त्यांचे प्राथमिक शिक्षण पार पडल्यानंतर वैद्यकीय शिक्षणासाठी ते खरेतर इंग्लंडला जाणार होते. परंतु वयाने सॅम खूपच लहान आहे असे लक्षात येताच वडिलांनी त्यांना अमृतसर कॉलेजला घातले. महाविद्यालयीन शिक्षण आटोपल्यानंतर त्यांना डेहरादूनच्या ‘इंडियन मिलिटरी अकॅडेमी’ मध्ये प्रवेश मिळाला व 4 फेब्रुवारी 1934 रोजी वयाच्या 20 व्या वर्षी त्यांना ’54 सिख रेजिमेंट’ मध्ये दाखल होण्यासाठी कमिशन मिळाले.
दुसऱ्या महायुद्धात ही रेजिमेंट ब्रह्मदेशाच्या आघाडीवर लढत होती. ब्रह्मदेशातील ‘विटाल पर्वतराजी’ चा परिसर ताब्यात घेण्यात सॅम यांची तुकडी यशस्वी झाली; पण जंगलातून परतत असताना एका जपानी मशीनगनने अचूक नेम साधला व सात गोळ्या माणेकशा यांच्या शरीरात घुसल्या. त्यांचा ऑर्डर्ली शेरसिंह याने वेळेवर त्यांना लष्कराच्या तळावर पोहोचविल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार झाले आणि ते वाचले. या युद्धात त्यांनी गाजविलेल्या शौर्याबद्दल त्यांना ‘मिलिटरी क्रॉस’ चा सन्मान प्राप्त झाला. स्वातंत्र्यानंतर ‘जनरल स्टाफ ऑफिसर’, ‘डायरेक्टर ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स’ अशी पदे चढत ते 1959 साली ‘कमांडेंट ऑफ डिफेन्स सर्व्हिसेस’ बनले. 1962 च्या चीन युद्धानंतर ईशान्य आघाडीवर नजर ठेवण्यासाठी त्यांची अरुणाचल प्रदेशमधील ‘फोर कोअर’ तुकडीच्या प्रमुखपदी नेमणूक करण्यात आली होती.
त्यानंतर तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी माणेकशा यांच्यावर पूर्व आघाडीची जबाबदारी सोपविली. त्यावेळी या आघाडीचे प्रमुख म्हणून तेथील किचकट भूगोलाचा जो त्यांनी अभ्यास केला तोच त्यांना 1971 च्या बांगलादेश युद्धामध्ये कामी आला. बांगलादेशातील अन्य मोठी शहरे टाळून त्यांनी ज्या वेगाने ढाका घेतले आणि पाकिस्तानी सैन्याला शरण येण्यास भाग पाडले ते कौतुकास्पदच होते. लष्करात न जाता आपण वैद्यकीय शिक्षण घेतले असते तर देशातील एक नामवंत स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून नाव कमविले असते असे ते गमतीने सांगत असत. आपल्या तुकडीतील सर्व सैनिकांशी त्यांची वागणूक प्रेमाची असे.
“संकलित बातम्यांमधून”
Today Inflation making life harder for common man. So would like to read on the same.
Best luck 🙂
Jai Maharashtra