यशोगाथा – 6


      डॉ. अभय आणि राणी बंग यांनी सुमारे 20 वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील गडचिरोली या सर्वाधिक मागासलेल्या जिल्ह्यात आपल्या ‘सर्च’ या सेवाभावी संस्थेमार्फत चालू केलेल्या कामाची कीर्ती आता आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन पोहोचलेली आहे. आज या दाम्पत्याच्या प्रेरणेमुळे गडचिरोलीसारख्या आदिवासी भागातील बालमृत्यूंचे प्रमाण 75 टक्क्यांनी खाली आले आहे. अनेक महिला आदिवासींना उपचार करण्यात त्यांनी सक्षम बनविले आहे. 80 खेड्यांमध्ये डॉ. बंग यांनी शिकविलेले आरोग्य संघटक कार्यरत असून बंग यांच्या या आरोग्यविषयक अनोख्या कार्यक्रमाची अंमलबजावणी आता भारतातील उर्वरित भागांत तसेच पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश आणि आफ्रिका खंडातील गरीब देशांमध्येही सुरु झाली आहे. विदर्भातील ठाकूरदास बंग हे गांधीवादी नेते स्वातंत्र्य चळवळीमध्ये सक्रिय होते. डॉ. अभय बंग हे त्यांचेच सुपुत्र होत.

 

Dr. Abhay and Rani Bang

 

जॉन हॉपकिन्स विद्यापीठातून डॉ. अभय आणि राणी बंग यांनी सार्वजनिक आरोग्य या विषयामध्ये पदवी मिळविली. आदिवासी समाजातील प्रचंड दारिद्र्यामुळे विविध आजार आणि कुपोषणामुळे नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण प्रचंड आहे हे लक्षात आल्यावर हे बालमृत्यू कसे कमी करता येतील याचा त्यांनी विचार सुरु केला. त्यासाठी त्यांनी ‘सोसायटी फॉर एज्युकेशन एक्शन एण्ड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ’ अर्थात ‘सर्च’ ही सेवाभावी संस्था स्थापली. त्यातून आदिवासी महिलांना गर्भारपणाच्या काळात तसेच प्रसुतीनंतर योग्य उपचार मिळू लागले.

1988 मध्ये आदिवासी मुलांच्या प्रत्येकी एक हजार बालकांपैकी 121 बालके दगावत असत. दोनच वर्षांनंतर हे बालमृत्यूचे प्रमाण 79 पर्यंत खाली आले. आता तर हेच प्रमाण  26 पर्यंत खाली आले आहे. बालमृत्यू होण्यामागील 18 कारणे त्यांनी शोधून काढली असून न्युमोनियासारख्या आजारावर इलाज करण्यासाठी त्यांनी अनेक गावांमधील स्थानिक आदिवासी महिलांना प्रशिक्षित केले आहे. ‘ब्रेथ काउंटर’सारखे वैद्यकीय उपकरणही बंग यांनी संशोधनाअंती तयार केले. शासनाने त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिलाच. पण ‘टाईम’ नियतकालिकानेही सर्व आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या जगातील 18 महनीय व्यक्तींमध्ये त्यांची निवड करून त्यांचा सन्मान केला.

संकलित बातम्यांमधून


About Sourabh Bhunje

Sourabh Bhunje, B.E. IT from Pune University. Currently Working at Techliebe. Professional Skills: Programming - Software & Mobile, Web & Graphic Design, Localization, Content Writing, Sub-Titling etc.

Leave a comment