गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘गीतांजली’ या काव्यसंग्रहाला 1912 या वर्षी साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाले. त्यानंतर कोणत्याही भारतीय लेखकास हा मान मिळालेला नाही. यावरूनच रवींद्रनाथ टागोर यांचे मोठेपण सिद्ध होते. टागोर यांचा जन्म 7 मे 1861 रोजी झाला. गुरुदेव टागोर यांना चित्रकला, शिक्षण आदी क्षेत्रांतही चांगली गती होती, जाण होती आणि त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांनी भरीव कार्येही केली. टागोर यांनी काव्यप्रकार हाताळण्याबरोबरच ‘नौकाडूबी‘, ‘गोटा‘ यांसारख्या कादंबऱ्या, ग्रंथ, नाट्यलेखन, साहित्यशास्त्र, भाषाशास्त्र, भौतिकशास्त्र आदी. विषयांतही त्यांनी व्यापक लेखन व ग्रंथनिर्मितीही केली.
शिक्षणाच्या क्षेत्रातही त्यांनी व्यापक कार्य केले. शांतीनिकेतनचेही संस्थापक टागोरच. विश्वभारती विद्यापीठाच्या स्थापनेतही त्यांचा सहभाग होता. रवींद्र संगीत ही त्यांचीच देणगी. भारतातील पारंपारिक नृत्य प्रकारास टागोर यांनी नवसंजीवनी दिली. वयाच्या 60 व्या वर्षानंतर चित्रकलेस प्रारंभ करून याही क्षेत्रात टागोर मान्यता पावले.
रवींद्रनाथ टागोर राजकीय घडामोडींबद्दलही कमालीचे जागरूक होते. लॉर्ड कर्झनने केलेल्या बंगालच्या फाळणीला त्यांनी जाहीर विरोध दर्शवलाच; परंतु 1919 मध्ये झालेल्या जालियानवाला बाग हत्याकांडाचा निषेध नोंदविण्यासाठी त्यांनी ‘सर‘ ही त्यावेळची प्रतिष्ठित पदवीही सरकारला परत केली. अल्पसंख्यांकाच्या स्वतंत्र मतदारसंघांनाही टागोर यांचा तीव्र विरोध होता. पहिल्या जागतिक महायुद्धाच्या काळात टागोर यांनी जपान व अमेरिकी जनसमुदायांसमोर विश्वशांतीची व्याख्याने दिली. ‘जन गण मन‘ हे त्यांचे गीत आज आपले ‘राष्ट्रगीत‘ म्हणून मान्यता पावले आहे. तमाम मानवजातीच्या स्वातंत्र्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले.
“संकलित बातम्यांमधून“