1904 साली फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये जन्मलेल्या जहांगीर रतनजी दादाभाई टाटा यांचे सर्वांना भावणारे ‘जेआरडी’ हे टोपण नाव होते. फ्रान्स, जपान आणि इंग्लंडमध्ये प्राथमिक शिक्षण घेतलेल्या जेआरडी यांनी एक वर्षासाठी फ्रान्सच्या लष्करी प्रशिक्षणाचा अनुभवही घेतला होता. त्यांना फ्रान्स लष्कर अथवा केंब्रिजमध्ये जाऊन शिकण्याची इच्छा होती; परंतु 1925 साली वयाच्या 21 व्या वर्षी त्यांना वडिलांनी भारतात बोलावून घेतल्याने त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण अपुरे राहिले. त्याची बोच त्यांना आयुष्यभर होती. परंतु अपरिचित असलेल्या देशामध्ये टाटा उद्योगसमूहाचा सर्व आघाड्यांवर त्यांनी जो विकास घडवून आणला त्याला खरेच तोड नाही. उद्योग आघाडी समर्थपणे सांभाळत असताना त्यांनी विज्ञानविषयक व सामाजिक संस्थांची उभारणी करून आपली देशाप्रती असणारी बांधिलकीही दाखवून दिली. उद्योग-व्यवसायात भारताचे नाव जागतिक स्तरावर नेणाऱ्या जे.आर.डी. यांचे खाजगी आयुष्य अत्यंत साधे आणि चिंतनशील होते.
अगदी तरुण वयात जेआरडी यांना विमान उड्डाणाचा छंद होता. त्यातूनच 1932 साली ‘टाटा एव्हिएशन सर्व्हिस’ ची स्थापना झाली. त्याचेच रुपांतर 1932 साली ‘टाटा एअरलाइन्स’ व नंतर 1953 साली ‘एअरइंडिया’ मध्ये झाले. 1938 मध्ये सर नवरोजी सकलातवाला यांच्याकडून टाटा समूहाच्या अध्यक्षपदाची सूत्रे जेआरडींनी हातात घेतली. त्यानंतर पुढील 50 वर्षांच्या त्यांच्या कारकीर्दीत टाटा उद्योगसमूहाची घौडदौड अबाधित राहिली. रसायने, स्वयंचलित वाहने, माहिती आणि तंत्रज्ञान, चहा तसेच हॉटेल व्यवसाय या विविध शाखांमध्ये ‘टाटा’ समूहाचा ध्वज कायमच मानाने फडकत राहिला. जेआरडी स्वतःच खासगीकरण आणि मुक्त अर्थव्यवस्थेचे पुरस्कर्ते होते. त्यानंतर ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’, ‘टाटा मेमोरियल हॉस्पिटल’, ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’, ‘एनसीपीए’ अशा संस्थांची उभारणी करून त्यांनी आपल्यातील सामाजिक जबाबदारीचे भानही सर्वांना दाखवून दिले.
“संकलित बातम्यांमधून“
Good ..