सुप्रसिद्ध अमेरिकन व्यंगचित्रपट निर्माता आणि दूरचित्रवाणीवरील व्यंग चित्रमालिकेचा जनक वॉल्ट डिस्ने यांचा जन्म 1901 साली शिकागो येथे झाला. जगभरातील बच्चे कंपनीला रिझविणाऱ्या ‘मिकी माऊस’, ‘डोनाल्ड डक’, ‘डॉग फ्लूटा’ तसेच ‘गुफी’ या कार्टून्सना डिस्ने यांनीच जन्म दिला. कॅलिफोर्निया राज्यातील अनाहीम येथील 160 एकर विस्तीर्ण भूमीवर 1955 साली त्यांनी ‘डिस्ने लॅण्ड’ ही अद्भुतरम्य नगरी उभारून जगभरातील सर्व लोकांना स्वप्नांमधील रम्य दुनिया पृथ्वीतलावर कशी अवतरते हेच दाखवून दिले. अमेरिकेला भेट देणारा प्रत्येक विदेशी पर्यटक ‘डिस्ने लॅण्ड’ ला भेट दिल्याशिवाय राहत नाही यातच वॉल्ट डिस्ने यांचे कर्तृत्व झळाळून उठते.
मिसुरीजवळील मार्सेलीन येथे प्राथमिक शिक्षण घेत असतानाच डिस्ने यांना रंगीत चित्रे काढण्याचा छंद जडला. मात्र पारंपारिक शिक्षणापेक्षाही त्यांचा ओढ अधिकतर चित्रकलेकडेच होता. 1917 ला शिकागो येथे परतल्यानंतर त्यांनी छायाचित्रण कलेचे रीतसर प्रशिक्षण घेतले व 1919 साली कॅन्सासा येथील एका कमर्शियल आर्ट स्टूडिओमध्ये नोकरी मिळवली. तेथे डिस्ने आपला मित्र आयवर्क्स यांच्या मदतीने एक दोन मिनिटे चालणाऱ्या जाहिरात फिल्म तयार करू लागले. ‘अलिस इन कार्टून लॅण्ड’ ही नंतर गाजलेली परीकथामाला त्यांनी या उमेदवारीच्या काळातच प्रथम तयार केली होती.
आयवर्क्स सोबत प्रथम डिस्ने यांनी ‘ऑस्वोल द रेंबिट’ या पहिल्या कार्टूनची निर्मिती केली. पण मुलांना रिझविणाऱ्या मनोरंजक, आनंदी व खोडकर अशा कार्टून्सच्या शोधात ते होते. अखेर 1927 साली त्यांना आपल्या कल्पनेतील ‘मिकी माऊस’ सापडला व त्यानंतर डोनाल्ड डक, गुफी, फ्लूटा ही पात्रेही त्यांनी विकसित केली. 1937 साली त्यांनी ‘स्नो व्हाईट अण्ड सेव्हन डवोर्फ्स’ ही पहिली पूर्ण लांबीची कार्टून फिल्म तयार केली. त्यानंतर ‘डम्बो’, ‘फ्लॉवर्स ऑफ ट्रीज’, ‘झोरो’, ‘डेव्ही कोकेट’ आणि ‘वंडरफुल वर्ल्ड ऑफ कलर’ या व्यंगचित्रमालिकांनी त्यांना तुफान आर्थिक यश मिळवून दिले.
“संकलित बातम्यांमधून“